नागपूर, दि. २९ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून जीवितहानी टाळण्यासाठी कठोर निर्बेंध लागू करण्यात आले आहेत. संकटाच्या या परिस्थितीत सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
नागपूर शहरातील मुफ्ती, मौलाना, समाजसेवक व बुद्धीजिवी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीस दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व माजी आमदार गिरीश गांधी उपस्थित होते.
नागपूर शहर ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने या परिसरात विविध उपाययोजनांची अमलबजावणी सुरु केली आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
विशेषत: रमजान महिना सुरु झाला असून मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करावे, असे कळकळीचे आवाहन करताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, कोरोना संसर्ग असलेल्या परिसरात जाऊ नका, तसेच साबणाने नियमित हात स्वच्छ करा. आरोग्य सुविधा व वैद्यकीय तपासणी मोठ्या प्रमाणात सुरु असून नागरिकांनी घरातच रहावे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
घराबाहेर न पडणे, मास्क घालून राहणे, नियमांचे पालन करणे, सुरक्षित अंतर ठेवणे व आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेणे या पंचसुत्रीचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यात.
रमजान महिना सुरु असल्यामुळे नमाज पठणसाठी एकत्र येऊ नका, घरीच नमाज पठण करा. समाजाची सुरक्षा महत्त्वाची असून सामाजिक स्वास्थ्यासाठी व मानवी कल्याणासाठी वरील पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुफ्ती, मौलाना, समाजसेवक व बुद्धीजिवी मंडळींचा समाजात प्रभाव आहे. त्यांनी दर दिवशी किमान शंभर नागरिकांना मोबाईलवर संदेश देवून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती करावी, असे त्यांनी सांगितले. समाज व प्रशासन एकत्र आल्यास कोरोनाचे संकट टळेल. नागपूर कोरोनामुक्त होईल व जनजीवन हळुहळु पुर्वपदावर येईल, असा आशावाद श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून केवळ सुरक्षित अंतर व दक्षता यामुळेच हे शक्य होईल, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले. अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून विविध उपाययोजना आखल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे ते म्हणाले.