अमरावती, ३० : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीतील वेळेचा उपयोग जागरूकपणे करावा,
या परिस्थितीला संयमाने सामारे जावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे मानसोपचार विभागाचे प्रमुख आणि अमरावती विभागाच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश साबू यांनी दिला.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. या लॉकडाऊनच्या काळात मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग योग्य पद्धतीने करावा, याबाबत डॉ. साबू यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत. यामध्ये त्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी नव्याने जोपासणे, कुटुंबियांना गुणवत्तापूर्ण वेळ देणे, भविष्याचे योग्य नियोजन करण्याचे सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक जण घरून काम करीत आहेत. त्यांना या काळात वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. दररोजचा व्यायाम, पोषक आहार, निश्चित काळाची विश्रांती, कुटुंबातील सदस्यांना दैनंदिन कामात मदत होईल, याचीही दक्षता घ्यावी.
पूर्ण वेळ घरी असल्यामुळे घरातील व्यक्तींकडून होणारा संवाद हा सकारात्मक होईल, यावर भर द्यावा. शासनाने केलेली संचारबंदी ही चांगल्यासाठीच आहे, ही बाब जाणून या काळात प्रत्येकाचे मनोधैर्य टिकून राहिल अशाच बाबींचा विचार आणि व्यवहार असावा, असेही त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवांमधील शासकीय अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेवा, पोलिस, माध्यम क्षेत्र, स्वच्छता कामगारांना कामासाठी बाहेर पडावेच लागत आहे. त्यांनी स्वच्छतेबाबत सांगितलेली नियमावली काटेकोरपणे पाळावी, प्रत्येक वेळी खबरदारी घ्यावी, असे त्यांनी आग्रहाने सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत आई -वडील दोघेही घरी आहेत. पालकांनी आपल्या बालकांसोबत हा कालावधी चांगला घालवावा. मुलांच्या गुणांना वाव मिळेल, अश्या बाबींमध्ये त्यांना गुंतविण्यात यावे. त्यांचा आवडीनिवडीप्रमाणे शक्य असल्यास ऑनलाईन वर्ग त्यांना सुरू करावेत.
तसेच पालकांच्या हाती भरपूर वेळ असल्याने बालकांना स्वावलंबी करण्यावरही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. लॉकडाऊनचा काळ आरोग्याच्या हितासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे वेळेचा सदूपयोग करा, असेही डॉ. साबू यांनी सांगितले.
निंभोरा, नांदगाव खंडेश्वर निवारा केंद्रात समुपदेशन
निंभोरा आणि नांदगाव खंडेश्वर येथील शासनाच्या निवारा केंद्रातील लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉ. अविनाश साबू यांनी समुपदेशन केले. या निवारा केंद्रात विविध राज्यातील श्रमिक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा बंदी असल्यामुळे त्यांना निवारा केंद्रात हलविण्यात आले. येथील श्रमिकांना डॉ. साबू यांनी कोरोना विषाणू संदर्भात माहिती दिली. निवारा केंद्रातील श्रमिकांच्या समस्या जाणून त्यांना या परिस्थितीत मनोधैर्य कायम राहावे, याबाबत डॉ. साबूंनी मार्गदर्शन केले.