संगमनेर :- तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये शनिवारी रात्री एक बिबट्या अडकला.
बिबट्यांची संख्या लक्षात घेता नागरिकांवर हल्ला करणारा हाच आहे का याबाबत मात्र संभ्रम आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याने दुचाकीवरील चार जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले.
एकाच रात्री झालेल्या बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यांतून सपना बाळासाहेब वाघमारे, वेणूनाथ सुखदेव सारबंदे, अविनाश चौधरी आणि आश्वी खुर्द येथील दीपक वसंत सोनवणे बचावले होते.
बिबट्याने निर्माण केलेल्या दहशतीमुळे परिसरातील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर असल्याने वनविभागाने हे बिबटे पकडावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने सुनील चौधरी यांच्या गट नंबर १७३ मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी रात्री नर जातीचा बिबट्या अडकला.