शिर्डी :- राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.
राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्यापेक्षा भाजपचे मुलायम ‘कमळ’ हाती घेतलेले बरे! या विचाराप्रत आलेले विखे पाटील पिता-पूत्र लवकरच काँग्रेस पक्ष सोडतील, अशी माहिती या वृत्तात दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेला नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांची कोंडी झाली आहे. गेली तीन वर्षे जोरदार प्रचार मोहीम राबवून रान तयार केले असले तरी आपले राजकीय शत्रू असलेल्या माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या नातवाचा नगरमधून राजकीय उदय होऊ द्यायचा नाही,
अशी अटकळ बांधून राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.