संगमनेर :- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील एमआरआय टेक्निशियन असलेल्या अमित अशोक मिंडे (वय २२) या युवकाने कौठेकमळेश्वर शिवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
डॉक्टर असलेल्या प्रेयसी तरुणीने लग्नास नकार दिल्याने प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी अमित मिंडे राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे एका खासगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन होता.
याच रुग्णालयात वडझरी खुर्द (ता. संगमनेर) येथील बीएचएमएस शिक्षण असलेली एक डॉक्टर तरुणी नोकरी करीत होती. एकाच रुग्णालयात असल्याने दोघांचे प्रेमसबंध जुळले होते.
दरम्यान, मंगळवारी (५ मार्च) संबंधित डॉक्टर तरुणी वडझरी खुर्द येथे घरी आली होती, तिच्या समवेत अमित मिंडे हादेखील आला होता; मात्र, संबंधित तरुणीने अमितला लग्नास नकार दिला.
प्रेमभंग झालेल्या अमित मिंडे याने मोबाइलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर कौठेकमळेश्वर शिवारात अमितने डाळिंब बागेत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेल्या असता त्यांना मृतदेह आढळून आला.