अहमदनगर :- लोकसभेसाठी इच्छुक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत असलेले विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर निवडणुकीच्या आधीच खासदार म्हणून घोषित केलय.
दररोज वेगवेगळ्या पक्षातून तिकीट मिळण्याबाबत बातम्या येत असताना ठोस काही निर्णय होत नसल्याने विखे समर्थकांची घालमेल वाढली असून विखे पाटील हाच एक पक्ष आहे, कुणाकडे उमेद्वारीसाठी हात पसरविण्याची गरज काय, असा सूर समर्थक आवळत आहे.
याबाबत सोशल मिडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात येत असून दक्षिणेत केवळ सुजय विखेंचाच बोलबाला जाणवतो आहे. वेळप्रसंगी अपक्ष लढवू अशी मागणी विखे निष्ठावंत करित असून सन्मानपूर्वक तिकीट मिळाले तरच घ्यावे अशी त्यांची धारणा आहे.
असं असलं तरी विखे परिवार सध्या वेट एण्ड वॉच या भूमीकेत असल्याचं कळतंय. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.