भर कार्यक्रमात आ.औटी आणि खा.विखेंतील वाद चव्हाट्यावर !

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- भोयरे पठार येथे वन विभागाच्या वतीने गॅसवाटपासाठी आमदार आणि खासदार दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते. दीड तास वाट पाहूनही खासदार येत नसल्याचे पाहून आमदारांनी गॅसवाटप उरकून घेतले.

उशिरा आलेल्या खासदार डॉ. सुजय विखे यांनीही त्याच लाभार्थींना तेथेच पुन्हा गॅस वितरण केले. यापुढे एका कार्यक्रमासाठी एकालाच बोलवत जा, असा खोचक सल्ला त्यांनी संयोजकांना दिला.

वनविभागाच्या वतीने २९९ उज्ज्वला गॅसच्या वितरणाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आमदार, खासदारांना निमंत्रित केले होते.

आमदार विजय औटी बरोबर पाच वाजता दाखल झाले. सुमारे दीड तास थांबल्यानंतर खासदार येत नसल्याचे पाहून औटी गॅस वितरण उरकून निघून गेले.

त्यानंतर काही वेळाने खासदार विखे दाखल झाले. पुन्हा त्याच लाभार्थींना खासदारांच्या हस्ते गॅसचे वितरण करण्यात आले.

यापुढे कोणत्याही कार्यक्रमाला एकाच पाहुण्याला बोलवत जा म्हणजे कोणाला राग येण्याचे कारण नाही, असा खोचक सल्ला खासदार विखे यांनी दिला.

खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दुपारी पारनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी आमदार औटी यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

पारनेर मतदारसंघातून सर्वात कमी मताधिक्य मिळाले, पण सुजय विखे होते म्हणून, तरी हे मिळाले. दुसरे कोणी असते, तर २५ हजारांनी मागे राहिले असते. माझी वेळ आता निघून गेली आहे. ज्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यांनी लक्षात ठेवावे.

आमच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. सन्मानाने सर्वांशी बोलले पाहिजे. कारण पारनेरचा आमदार कोण होणार हे मी आणि येथे बसलेले ठरवणार आहोत.

संध्याकाळच्या कार्यक्रमाला विखे उशिरा आले ते जाणीवपूर्वक की अनावधानाने यासह विधानसभा निवडणुकीत, तरी दोघांचे टायमिंग जुळेल का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment