नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Published on -

अहमदनगर :- नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून शासकीय रुग्णालयांतही गर्दी वाढली आहे. 

पाणी साचलेल्या ठिकाणी डासाच्या अळ्यांची निर्मिती जोमात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत.

पावसाच्या पाण्याचा निचरा तातडीने होणे आवश्यक आहे. नैसर्गिक उतारसुलभ रस्त्यांची रचना होणे गरजेचे होते. वर्षानुवर्षे या बाबीकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शिवाय घरांच्या छतावर पडलेल्या रिकाम्या बाटल्या, टायर, नारळाच्या करवंट्या आदी टाकाऊ वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचून तेथे डासाच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते.

डासांचा उपद्रव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या आजाराचा ताप वाढला आहे. डास नियंत्रणासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात डासअळ्या निर्मिती केंद्र नष्ट करण्यावर भर देण्यात आलेला नाही. त्यामुळे धूरफवारणीसह विविध उपाय योजना तुटपुंज्या ठरत आहेत. 

शासकीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात मनपा हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आकडा शंभरावर आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने आता जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेणार याकडेच शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News