जेलमधून पळालेला आरोपी काही तासांतच जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : येथील श्रीगोंदा उपकारागृहातून न्यायालयीन कोठडीत असणारा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शंकर बारकू शिंदे याने मंगळवार दि.८ रोजी पहाटे चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान कारागृहातील बंदजाळीच्या पडवीतील कौल उचकटून पलायन केल्याची घटना घडली होती.

परंतु पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत अवघ्या काही तासातच या पलायन केलेल्या आरोपीला श्रीगोंदा शहराजवळील बोरुडेवस्ती येथून ताब्यात घेतले. सदर आरोपी शंकर शिंदे याच्या विरोधात पो.कॉ योगेश सुपेकर यांच्या फिर्यादीवरून कारागृहातून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पलायन केलेला आरोपी काही तासातच जेरबंद करण्यात यश मिळाल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आरोपी शंकर शिंदे हा शेडगाव येथील एका खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला बीपी व शुगरचा त्रास असल्यामुळे त्याला बंद जाळीत बसवण्यात आले होते.

दि८रोजी पहाटे आरोपी शिंदे हा जाळीत झोपलेला होता. परंतु सदरवेळी ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्याने औषध घेतलेले होते. त्यामुळे या संधीचा फायदा उचलत आरोपी शंकर शिंदे याने लॉकअप खोली क्र.२ समोरील बंदजाळीतील पडवितील कौल उचकटून पळून गेला.

त्यानंतर सदर कर्मचाऱ्यास आरोपी शंकर शिंदे हा त्याठिकाणी बंदजाळीत दिसून आला नाही. त्यावेळी शिंदे याने जाळीतून पलायन केल्याचे पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी वरिष्ठांना कळवले त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत सदर आरोपीला काही तासातच पुन्हा जेरबंद केले आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment