माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाका… अशी चिठ्ठी लिहून पेंटरची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

जळगाव :- माझ्या मृत्यूस मीच कारणीभूत आहे. माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाकावे, अशी चिठ्ठी लिहून पेंटरने हरिविठ्ठलनगरातील स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाने मृतदेह बघितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. राजेश हिंमत मकवाना (४०, भटवाड्याजवळ हरिविठ्ठलनगर) असे मृत पेंटरचे नाव आहे. ते पेंटिंगचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी व मुले धरणगाव येथे माहेरी गेलेले होते. 

घरात कुणी नसताना पत्र्याच्या छताच्या पाइपला साडीने गळफास घेऊन राजेश यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी घराच्या दरवाजाच्या कड्या आतून लावलेल्या होत्या. त्यांचा मोठा मुलगा दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी आला. त्याने समोरचे दार ठोठावले; परंतु दरवाजाला आतून कडी लावलेली होती. 

त्यामुळे त्याने घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा लोटून आत प्रवेश केला. त्यावेळी त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 याबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला. विवेक बापू मोरे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 मृत मकवाना यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, ३ भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात राजेश यांनी आत्महत्या का केली? याचा पोलिस शाेध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment