मुंबई : दारूसाठी सख्ख्या मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भावाला गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पोलिसांनी तीन वर्षांनंतर अटक केली आहे. विजय लक्ष्मण मानुस्करे (२५) असे अटक आरोपीचे नाव असून तो घणसोली, नवी मुंबईत राहत होता.
गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलीस नायक हृदयनारायण मिश्रा यांना एका विश्वसनीय बातमीदाराने खबर दिली की, २०१६ मध्ये सिद्धिविनायक टिटवाळा येथे राहणाऱ्या आरोपीने त्याचा सख्खा मोठा भाऊ उमेश लक्ष्मण मानुस्करे (२७) याची हत्या करून त्याचा मृतदेह टिटवाळा येथील काळू नदीत फेकून दिला.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी या प्रकरणाचा तपास केला असता सराईत गुन्हेगार असलेला उमेश हा पायधुनी पोलीस ठाण्यातील चोरी प्रकरणात ६ महिन्यांची शिक्षा भोगून २७ ऑगस्ट २०१६ रोजी बाहेर आल्याची माहिती मिळाली.
कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसे डॅम येथे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळण्याची नोंद पोलिसांना आढळून आली. त्यावरून केलेल्या तपासात तो मृतदेह उमेश याचा असल्याचे उघड झाले.
मात्र त्याच्या कुटुंबीयांनी उमेश हरवल्याची तक्रार दिली नव्हती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपीला मशीद बंदर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मोठा भाऊ उमेशच्या खुनाची कबुली दिली.
दारूसाठी पैसे मागितले असता उमेशने पैसे न दिल्याने रागाच्या भरात त्याने बीयरच्या बाटलीने त्याची हत्या करून चुलत भावाच्या मदतीने मृतदेह नदीत फेकल्याची कबुली पोलिसांना दिली.