परळी –
धुणीभांडी करून घर चालविणाऱ्या एका महिलेला दागिने चोरीचा आळ असह्य झाला. चौकशीसाठी पोलीसही घरी येऊन गेल्याने धास्तावलेल्या महिलेने विषारी द्रव प्राशन करुन शनिवारी (दि.९) आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करुन मयत महिलेचा मृतदेह शहर पोलीस ठाण्यासमोर नेला.
छबूबाई नारायण पाचमासे (५०, रा.परळी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या शहरात धुणीभांडी करुन घर चालवायच्या. छबूबाईच्या पतीचे निधन झालेले असून त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने छबूबाई धुणीभांडी करुन उदरनिर्वाह भागवायच्या.
त्या जेथे धुणीभांडी करायला जात त्यापैकी एका महिलेने त्यांच्यावर दागिने चोरीच आरोप केला होता. याबाबत सदरील महिलेने छबूबाई यांच्याविरोधात शहर पोलिसांत तक्रार अर्जही दिला होता.दरम्यान,हा अर्ज मिळाल्यानंतर पोलीस चौकशीसाठी छबूबाईच्या घरी गेले त्यानंतर ७ नोव्हेंबरच्या रात्री भीतीपोटी छबूबाईने विषारी द्रव प्राशन केले.
नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ बनल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.
त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र नातेवाईकांनी रुग्णवाहिका जीप थेट शहर ठाण्यासमोर आणून उभा केली.