वर्धा : घरच्या मंडळींचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या एका मुलीला जंगली जनावरांपासून शेतात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाह तारेला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मजरा गावाजवळ घडली.
भद्रावती तालुक्यातील निंबाळा येथील हेमंत बाळकृष्ण दडमल (वय २३) याचे वरोरा तालुक्यातील खैरगाव (परसोडा) येथील कोमल गराटे (१९) हिच्यासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हेमंत हा खैरगाव येथे त्याचे मामा अरविंद वाघ यांच्याकडे येत होता.
यातूनच त्याची कोमलसोबत ओळख झाली व प्रेमसंबंध जुळले. या दोघांचाही लग्न करण्याचा विचार होता. परंतु, त्यांच्या आई-वडिलांचा याला विरोध होता. अलीकडे पोळा सणानिमित्त हेमंत खैरगावला मामाकडे आला असता त्याची कोमलसोबत भेट झाली.
या भेटीत दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवार, १ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोघेही निघाले. दरम्यान, कोमलच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच त्यांनी कोमल व हेमंतचा शोध सुरू केला.
कोमलचे नातेवाईक पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास येताच दोघांनीही मजरा गावच्या पांदण रस्त्याने शेतातून पळून जाण्याचा बेत आखला. त्या मार्गाने ते पुढे जात असताना वाटेतील गेडाम यांच्या शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता तारेमधून सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का कोमलला लागला व ती खाली कोसळली.
हेमंतने तिला तारेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यामुळे तो माघारी फिरला आणि कोमलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घाबरलेल्या अवस्थेत हेमंतने रात्र त्याच परिसरात काढली आणि सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वत: वरोरा पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
- महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू
- मुंबई ते दिल्ली तब्बल 130 Kmph वेग ! अशी आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
- नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!