पाथर्डी :- लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार, या मुद्यावरून बुधवारी रात्री माजी नगरसेवक व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यामध्ये तुंबळ मारामारी झाली.
ही घटना शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. हा वाद उशिरा पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत गेला. मात्र, कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.

याबाबत माहिती अशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान असलेले एक माजी नगरसेवक रात्री नऊच्या सुमारास नगरपालिकेतील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला घेऊन शेवगाव रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले.
तेथे त्यांची भेट प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते असलेल्या एका शिक्षकाशी झाली. लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार या मुद्यावरून दोघांमध्ये चर्चा झाली.
तालुक्याच्या राजकारणात शिक्षक नेते हे भाजपचे कट्टर समर्थक मानले जातात. दोघेही हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर मुद्यावरची लढाई गुद्यावर आली. दोघांमध्ये तुंबळ मारामारी झाली.
नंतर पालिकेचा कर्मचारी व हॉटेलमधील ग्राहकांनी दोघांनाही बाजूला करत वाद मिटवला.
मात्र, त्या नंतर रात्री उशिरा हा माजी नगरसेवक आपले काही साथीदार घेऊन प्राथमिक शिक्षकाच्या घरी गेला.पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. नंतर माजी नगरसेवकाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मात्र, त्याच वेळेस प्राथमिक शिक्षकाचे काही नातेवाईक, पालिकेतील एक पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील नेते जमा झाले. त्यांनी या वादावर पूर्णविराम टाकला. या प्रकरणाची मात्र शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.