दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना पकडले

Ahmednagarlive24
Published:

राहाता : तालुक्यातील शिंगवे येथे मोटारसायकल चोरी करताना राहात्याच्या दोन अल्पवयीन मुलांना नागरीकांनी पकडले. एक जण गाडी घेऊन पसार झाला. याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंगवे येथील शेतकरी संभांजी रंगनाथ नरोडे हे रूई रोडवरील आपल्या शेताजवळील रस्त्यावर मोटारसायकल लावून शेतात गवत कापत होते. यावेळी तिघे अल्पवयीन मुले त्याठिकाणी एका मोटारसायकलवर आले. 

मोटारसायकलला चावी असलेली पाहून त्यातील एकाने ती चालू करून पळ काढला, तर इतर दोघांनी त्यांनी आणलेल्या गाडीवरून पलायन केले. हा प्रकार नरोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. 

काही अंतरावर दोघांच्या मोटारसायकलची चैन तुटली. ती बसवत असताना त्यांना नागरिकांनी पकडले; मात्र तिसरा नरोडे यांची मोटारसायकल घेऊन पळून गेला.

पकडण्यात आलेल्या दोघांनाही शिंगवे गावात नेऊन नागरीकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. तोपर्यंत दोघांना ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन राहाता पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. 

त्यात दोघे अल्पवयीन असल्याने लेखी घेऊन त्यांना सोडून देण्यात आले, तर तिसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment