जाचाला कंटाळून विवाहितेची शेततळ्यात आत्महत्या

Published on -

राहुरी :- तुला मूलबाळ होत नाही, तू वांझोटी आहेस. नवीन कार घेण्यासाठी वडिलांकडून एक लाख रूपये आण, असे म्हणत सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.

वांबोरी शिवारातील जरे यांच्या गट क्रमांक ७३१ मधील शेततळ्यात ही घटना शनिवारी घडली. तरूणीचे वडील बाळासाहेब त्रिंबक पटारे (पुलवाडी, वांबोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सासरच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पती अंबादासला ताब्यात घेतले आहे.

कविता पटारे हिचा २००९ मध्ये मानोरी येथील अंबादास वाकळे याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या ३ वर्षांनंतरही मूलबाळ न झाल्याने पती अंबादास, सासू हिराबाई यांच्याकडून कविताचा छळ सुरू झाला. मानसिक छळ सुरू असतानाच सासरच्या लोकांनी नवीन कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून तगादा सुरू केला.

कविताच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने कारसाठी पैसे देणे शक्य नव्हते. या त्रासाला कंटाळून कविता सासरच्या घरातून बाहेर पडली. सोमवारी सकाळी वांबोरी येथील जरे यांच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

या तरूणीला पाण्याबाहेर काढल्यानंतर तिची ओळख पटण्यास मदत झाली. या घटनेने सासर व माहेरच्या लोकांचा वाद उफाळून आल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. कविताचे वडील बाळासाहेब पटारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरूध्द विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe