पिक विमा कंपन्यांना राजू शेट्टींनी भरला दम, म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

सारोळा – परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या गेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने विनाअट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी 

पीक विमा कंपन्यांनीही हात न आखडता १०० टक्के विम्याचा लाभ द्यावा अन्यथा धडा शिकवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 

सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे मंगळवारी (दि.५) ओल्या दुष्काळात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. 

ते पुढे म्हणाले, परतीच्या पावसात आणि अतिवृष्टीत शेतीमाल वाहून गेला, शेतीचे तळे बनल्याने पिकांना कोंब फुटले, अशा विदारक परिस्थितीत सरकारकडून पंचनाम्याचा घाट घालण्यात येत आहे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत आहे. शासनाने विनाअट सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी.

अडीच महिन्यांपूर्वी महापुराने बाधित शेतकऱ्यांना सरकारने पीक कर्ज माफ केले, पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही २५ हजारांच्या तीनपट रक्कम देण्यासंदर्भात शासन निर्णय झालेला आहे. हाच शासन निर्णय अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी करून त्यांना एकरी २५ हजारांची मदत करावी. 
पीक विमा कंपनीने कसलही कुरकुर न करता १०० टक्के विम्याचा लाभ द्यावा अन्यथा येत्या काळात सरकार व पीकविमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा सज्जड दमही शेट्टी यांनी यावेळी दिला.

मंगळवारी त्यांनी सिल्लोड तालुक्यातील भवन, मंगरूळ, चिंचपूर, बहुली, मांडणा, उंडणगाव, गोळेगाव, लिहाखेडी, सारोळा, पानवडोद येथे पीक नुकसानीची पाहणी केली..

यावेळी शेट्टी यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते रंगनाथ काळे, स्वाभिमानीचे शहराध्यक्ष कृष्णा साबळे, जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, तालुकाध्यक्ष सुनील सनान्से, उपजिल्हाध्यक्ष युवा मुक्ताराम गव्हाणे, तालुका संघटक युवराज वराडे, भगवान खंबाट, लक्ष्मण मुरकुटे, संदीप लोखंडे, सोमिनाथ कळम, गजानन मिसाळ, दिलीप मुरकुटे, संपत वराडे, ज्ञानेश्वर गरुड, संतोष काकडे, आप्पा निकोत, समाधान कळम आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment