विमा कंपनीवर शिवसैनिकांचा हल्ला

Ahmednagarlive24
Published:

पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत.

अशा प्रकारे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असतानाही विमा कंपन्या बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी संतप्त शिवसैनिकांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘इफ्को टोकिओ’ कंपनीच्या कार्यालयावर जोरदार हल्ला चढवत कार्यालयाची तोडफोड केली.

शेतकऱ्यांना तत्काळ विम्याचा लाभ न दिल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला. अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

शिवसैनिकांचा हल्ला शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी सकाळी कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावरील ‘इफ्को टोकिओ’ इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते; परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने शिवसैनिक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी खुर्च्यांची तसेच काचांची तोडफोड केली. कार्यालयातील संगणकाचीही नासधूस करण्यात आली.. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी सूरज लोखंडे म्हणाले की, राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. मात्र, विमा कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment