आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नाही…

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- राहुल गांधी नगर जिल्ह्यात येत आहेत, पण त्यांचे स्वागत करण्यासाठी ना जिल्हाध्यक्ष ना विरोधी पक्षनेता अस्तित्वात आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षांना यापेक्षा काय मोठी भेट असेल, असा उपरोधिक टोला लगावत आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीरामपूर येथील सभेत बोलत होते. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, नगर जिल्ह्यातील लोकांचे आभार मानले पाहिजेत. राहुल गांधींचे तुम्ही खूप चांगले स्वागत केले. विरोधी पक्षनेत्याने व जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

त्यामुळे ‘आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी लावण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. राहुल गांधी गरिबांना न्याय देतो असे सांगतील.

त्यांचे आजोबा, आजी, वडील, आईला गरिबी हटवता आली नाही. आता हे गरिबी हटवणार आहेत. काय खाऊन गरिबी हटवणार हे कळायला मार्ग नाही.

गरिबांना ७२ हजार रुपये देणार, असे राहुल गांधी सांगतात, पण कुठून देणार याचे उत्तर देत नाहीत. तुमची सत्ता असताना साधे ७२ पैसे यांनी गरिबांना दिले नाहीत.

विरोधक नुसते मोदींवर टीका करतात. यांना सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. पुढील काळात राहुल गांधी यांचे भाषण केवळ मनोरंजनासाठी दाखवले जाईल, असा टोला फडणवीस यांनी मारला.

या देशामध्ये गरिबीच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी लढले आहेत. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment