ठाणे : गोवा, कर्नाटक, मणिपूर या ठिकाणी भाजपाचे कमी आमदार निवडून आले असतानाही आमदारांची तोडफोड करून भाजपाने सरकार स्थापन केले, ही भाजपाची नीती.
त्यामुळे महाराष्ट्रातही आमदारांचा घोडेबाजार होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेसचे माजी प्रभारी आणि प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी भाजपाच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. भाजपा सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते ठाण्यात आले होते.
मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने भाजपा आमदार फोडण्याचे षड्यंत्र करतील, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेने आपले सर्व आमदार मुंबईत रंगशारदामध्ये ठेवले असून, काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूरमध्ये हलवण्याची तयारी केली आहे.
ठाण्यात आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मोहन प्रकाश यांनीदेखील अशाच प्रकारची भीती व्यक्त केली आहे. तर माजी मंत्री नसीम खान यांनीदेखील भाजपावर या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे. अशा प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण करणे हे भाजपाचा जुना डाव असल्याचा आरोप केला आहे.
मात्र, काँग्रेसचे सर्व आमदार पक्षाशी प्रामाणिक असल्याने कोणत्याही प्रकारचा दगाफटका होणार नसल्याचे खान यांनी सांगितले.