उल्हासनगर : तीन सोनारांनी सोने घडणावळीकरता दिलेले ३ किलो ७०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन दोन कारागीर पसार झाल्याची घटना उल्हास नगरमध्ये घडली. त्याची किंमत सुमारे १ कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये असल्याचे समजते.
उल्हासनगरातील कॅम्प नं. २ येथील सोनार गल्लीत पश्चिम बंगाल येथील विश्वजीत डे व सुजीत डे या दोन भावांचे सोने घडणावळीचे दुकान आहे. त्यांनी या भागात विविध सोनारांचा विश्वास संपादन केला होता.
येथील मोहन घनशानी, नवीन वलेचा, विक्रम लखवानी या तीन सोनारांनी या दोघांकडे ३ किलो ७०० ग्रॅम वजनाचे सोने घडणावळीकरता दिले होते.
त्याचा अपहार करून हे दोघे भाऊ पसार झाले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.