श्रीरामपूर – भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा करायचा किंवा नाही याबाबत विविध मतमतांतरे व्यक्त करण्यात आली. मात्र कांबळे यांना पराभूत करण्यासाठी प्रसंगी जो मातब्बर उमेदवार असेल त्याच्या मागे आपल्या संघटनेची ताकद उभी करावी, असा सूर ससाणे समर्थकांच्या आज दुपारी झालेल्या बैठकीत दिसून आला.
बैठकीत याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार करण ससाणे यांना देण्यात आले. आज सुयोग मंगल कार्यालयात स्व. जयंतराव ससाणे यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास करण ससाणे, नानासाहेब पवार, जी. के. पाटील, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, मुख्तार शहा, सचिन गुजर, डॉ. वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, संजय छल्लारे, भाऊसाहेब डोळस, यादवराव लबडे, बाबा दिघे, दिलीप नागरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीनिवास बिहाणी म्हणाले, काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा आपल्यातला अपक्ष उमेदवार उभा करू, त्याच्या मागे साम, दाम, दंड भेदाने उभे राहून त्याला निवडून आणू, असे सांगितले. यावेळी बोलताना संजय छल्लारे म्हणाले, दोनदा ज्या ससाणेंनी निवडून दिले त्यांना ऐनवेळी कांबळेंनी धोका दिला. ससाणेंचे शेवटचे शब्द होते की, भाऊसाहेबाला पुन्हा निवडून येवू देवू नका.
मी व श्रीनिवास बिहाणी स्वतः त्याचे साक्षीदार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाकीचे विषय बाजूला ठेवून एकत्रित येवून भाऊसाहेब कांबळेंना पाडण्याचा सर्वांनी निर्धार करावा. कोणता कोण उमेदवार द्यायचा हे करण ससाणे ठरवतील. यावेळी बोलताना डॉ. वंदना मुरकुटे म्हणाल्या, आपण नेमके कोणत्या पक्षात आहोत, असे लोक विचारतात. त्यामुळे त्याचाही निर्णय करायला पाहिजे. कांबळेंना शह द्यायचा हे सर्वाचे ठरले आहे.
परंतु ना. विखेंचे मार्गदर्शन घेवून नेमके काय करायचे? कोणता उमेदवार द्यायचा हे ठरवू. भिजत घाडग फार दिवस ठेवण्यात उपयोग नाही, असे माझे वैयक्तीक मत आहे, असे वंदना मुरकुटे म्हणाल्या. तिरंगी, चौरंगी लढत झाल्यास आणि आपण अपक्ष उमेदवार उभा केल्यास आपली मते कुजू शकतात. त्यामुळे जो उमेदवार कांबळे यांना पाडू शकतो, अशा उमेदवाराच्या मागे आपल्या संघटनेची ताकद उभी करुन कांबळेंचा पराभव करावा, असे भवार यांनी सांगितले . १० वर्षापेक्षा कोणीही श्रीरामपुरात आमदार झालेला नाही. त्यामुळे कांबळेंचा पराभव निश्चित आहे. ससाणेंच्या जाण्याने तालुक्याचा रिव्हर्स गेर पडला आहे.
त्यामुळे आता सवांनी एकजुटीने विचार करुन रामचंद्र जाधव यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी निलेश भालेराव यांनी केली. अपक्ष उमेदवार दिल्यास लोकांपर्यंत चिन्ह जायला वेळ लागतो त्याला आपल्या संघटनेचे ४० – ४५ हजाराच्यावर मते पडणार नाही. खासदारकीला वाकारे झाले तसेच अपक्ष उमेदवाराचे होईल त्यामुळे अपक्ष उमेदवार न देता कांबळेंना पाडू शकेल, अशा सक्षम उमेदवाराला ताकद द्यावी, अशी मागणी सुधीर नवले यांनी केली.
साहेबांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे गद्दार कांबळेना कदापि निवडून द्यायचे नाही. अपक्ष उमेदवार उभा करायचा किंवा काय? हे येत्या एक दोन दिवसात आपण जाहीर करू. मात्र जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात आहे, असे सुचक वक्तव्य करण ससाणे यांनी मेळाव्याच्या सांगतेप्रसंगी केले.
त्यामुळे ससाणे गटाच्या भूमिकेविषयी गूढ अधिक वाढले आहे. कारण या बैठकीत दोन मतप्रवाह व्यक्त झाल्याने पुढे काय होते हे पहाणे उत्सुकतेचे आहे.