भाजपाचे अनेक नेते माझ्या संपर्कात : शरद पवार

Ahmednagarlive24
Published:

ठाणे : ‘ते ज्या पक्षात काम करत आहेत, त्या ठिकाणी योग्य सन्मान मिळत नसल्याने काही महिन्यांपासून आमच्या संपर्कात आहे त,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केला.

आम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान करतो, मात्र ते जिथे गेले तिथे तसे वातावरण नाही; हे माहीत असतानाही ते तिकडे गेले, असा टोला पवार यांनी गणेश नाईक यांना लगावत भाजपामुळे भविष्य नाही, असे वाटणारे सत्ताधारी पक्षाचे सगळेच संपर्कात आहेत, असा दावाही त्यांनी केला.

कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार गुरुवारी ठाण्यात आले होते. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत असून, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथील माझ्या दौऱ्यात हे प्रकर्षाने जाणवले.

विशेष म्हणजे ईडी प्रकरणानंतर आम्हाला मिळणारा जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात सुमारे ८० टक्के युवक असल्याचा दावा शरद पवार यांनी केला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शरद पवार यांचा उल्लेख आव्हाड यांनी ८० वर्षांचे तरुण असा केला. त्यावर मनमुराद हसत. पवार यांनी दाद दिली.

पवार म्हणाले, माझ्या ५० वर्षांच्या सामाजिक जीवनात तरुण वर्गाचा इतका उदंड प्रतिसाद मी पहिल्यांदा अनुभवतोय. महाराष्ट्रात काढलेल्या दौऱ्याप्रसंगी ८० टक्के तरुण मतदार विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांतील शेतकरी, महिला, कामगार हे त्रस्त असून, सरकारवर नाराज असल्याचे दिसून आले. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याची नीती सत्ताधाऱ्यांची आहे. भाजपा ईडी, सीबीआयचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, हे आता जनतेच्या लक्षात आले असून, ही नाराजी मतदानातून उघड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment