मुलाने ‘ह्या’ कारणामुळे दवाखान्यातच बापाचा केला गळा दाबून खून

Ahmednagarlive24
Published:

कोल्हापूर : वृद्ध वडिलांच्या जांघेत गाठ उठल्याने ते सतत आजारी पडतात. दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु त्या अयशस्वी ठरल्या. उपचाराचा खर्च पेलवत नव्हता. 

वडिलांना होणाऱ्या असह्य वेदना पाहून हतबल झालेल्या मुलाने धाडसी निर्णय घेत चुलत्याच्या मदतीने वडील नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडित्रे, ता. करवीर) यांचा सीपीआर रुग्णालयातच गळा दाबून खून केला. मे २०१९ मध्ये झालेल्या या खुनाला पाच महिन्यांनंतर शवविच्छेदन अहवालामुळे वाचा फुटली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश नामदेव भास्कर (वय ३२) व तुकाराम पांडुरंग भास्कर (वय ५३, दोघे. रा. कुडित्रे, ता. करवीर) या दोघा चुलत्या-पुतण्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. 

हा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्या ठाण्याकडे वर्ग केला आहे. वडिलांच्या आजारपणाचा खर्च टाळण्यासाठी मुलानेच खून केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नामदेव भास्कर हे शेती व शेतमजूर म्हणून काम करत होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या जांघेत लहान गाठ उठली होती. ही गाठ दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे नामदेव यांना वेदना होऊ लागल्या. 

मुलगा गिरीश याने कुटुंबीयांशी चर्चा करून वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली; मात्र पुन्हा दीड-दोन वर्षांनंतर तोच त्रास होऊ लागला. पुन्हा शस्त्रक्रिया केली. सातत्याने होणारा खर्च, औषधोपचार यामुळे भास्कर कुटुंबीय हतबल झाले होते. . वडिलांच्या उपचारासाठी मित्र व नातेवाइकांकडूनही उसनवारी झाली होती. यापुढे खर्च करणे शक्य नव्हते.

 मे २०१९ मध्ये नामदेव भास्कर यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. जांघेतील गाठीमुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. वडिलांना होणारा हा त्रास मुलास पाहवत नव्हता. इतक्या वेदना होण्यापेक्षा वडिलांचा मृत्यू झाला तर ते वेदनेतून मुक्त होतील, असे मुलगा गिरीशला वाटत होते. त्याने आपल्या मनातील विचार चुलत्याला सांगितला. 

त्यावेळी त्यानेही त्याला संमती देत संगनमताने २१ मे, २०१९ रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका यांची नजर चुकवून नामदेव भास्कर यांच्या हाताचे सलाईन काढले, तसेच नाकात कापसाचे बोळे घालून रुमालने नाक व तोंड, गळा दाबून खून केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment