नेवासा : विधानसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान दारू पिऊन गोंधळ घालणारा कर्मचारी नंदकिशोर भीमराज नाबदे (रा. शिरसगाव, ता. नेवासा) याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर व्यक्ती पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचे समजते.. याबाबत पोलीस हवालदार अंकुश पोटे यांनी फिर्याद दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील ज्ञानोदय हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते.

सकाळी दहाच्या सुमारास प्रशिक्षणासाठी आलेला कर्मचारी नंदकिशोर नाबदे हा प्रशिक्षण सुरू असताना दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घालत होता. दरम्यान, या गोंधळामुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाकामी अडचण निर्माण होत असल्याने तहसीलदार रुपेश सुराणा यांनी पोलिसांना बोलावून तळीराम नाबदे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी उपनिरीक्षक भारत दाते यांच्यासह आलेला मुख्य हवालदार तुळशीराम गीते, प्रीतम मोढवे व पोटे यांनी त्यास ताब्यात घेतले.