अहमदनगर : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून एकास १० ते १५ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीचे दोन हजार रूपये रोख व तीन मोबाईल असा एकूण १ लाख १० हजारांचा ऐवज गहाळ झाला आहे.
या मारहाणीत साकीन नौशाद सय्यद (रा.आलमगीर) हे जखमी झाले आहेत. ही घटना नगर तालुक्यातील कोल्हेवाडी कमानीजवळ घडली. सय्यद यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, काल्हेवाडी कमानीजवळ गाडीला कट मारल्याच्या कारणावरून नौशाद सय्यद यांस दिपक साहेबराव बनकर,नवनाथ अर्जुन गव्हाणे,कुंदन भास्कर कसबे,अक्षय विठ्ठल जाधव,दादा तुकाराम जाधव,राहुल धर्मा कुटे,रामकृष्ण कुंडलिक बनकर,विनोद दिगंबर घुगरे,साहेबराव काशिनाथ बनकर व इतर पाच ते सहा जण (सर्वजण रा.कोल्हेवाडी कमानीजवळ ता.नगर)अशा या सर्वांनी तू गाडीला कट का मारला अशी विचारणा करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी दीपक बनकर याने फिर्यादीचा मुलगा साकिन नौशाद सय्यद याच्या डोक्यात लोखंडी टॉमीने मारहाण करून जबर जखमी केले.तर इतरांनी या दोघा बापलेकास लाथाबुक्यांनी मारहाण करत दमदाटी करून शिवीगाळ केली. यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्या झटापट झाली.
या झटापटीत फिर्यादीचे रोख दोन हजार रूपये,८ हजार रूपयांचा विवो कंपनीचा मोबाईल, ७५००० हजार रूपयांचा ॲपल कंपनीचा आयफोन,२५ हजारांचा ॲपल कंपनीचा आयफोन असा एकूण १ लाख १० हजार रूपयांचा ऐवज गहाळ झाला आहे.
याबाबत फिर्यादी नौशाद अहमद सय्यद यांच्या फियार्दीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात वरील १० ते १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.