श्रीरामपूर :- तालुक्याचे प्रश्न सोडवायला आमदार भाऊसाहेब कांबळेच हवेत, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणताच कांबळे याना स्वतःच्या घरचा रस्ताही दुरूस्त करता आला नाही, अशी टीका अनिल कांबळे यांनी केली.
श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार भाऊसाहेब कांबळे हवेत, असे आवाहन मुरकुटे यांनी करताच स्वतःच्या घराकडे जाणारा गोंधवणी रस्तादेखील त्यांना गेल्या दहा वर्षांत दुरुस्त करता आला नाही, ते मतदारसंघाचा काय विकास करणार, असा सवाल अनिल कांबळे यांनी केला.
शिवसेनेच्या प्रचारसभेत मुरकुटे म्हणाले, लोकसेवा विकास आघाडीने भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे. आपण सत्तेत असलो, तर पाणी प्रश्नासह विविध योजना व विकासकामे राबवण्यात अडचणी येत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार सभेत अनिल कांबळे म्हणाले, केवळ स्वार्थासाठी व सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात जाण्यात धन्यता मानणाऱ्या लोकप्रतिनिधीला श्रीरामपूर तालुक्यातील जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
श्रीरामपूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत रोजगार, पाटपाण्याचा प्रश्न, रस्त्यांची झालेली दुरवस्था आदी महत्त्वांच्या प्रश्नाकडे आमदार कांबळे यांचे लक्षच गेले नाही, असाही आरोप करण्यात आला.