शिर्डी गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजुरी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. शिर्डीतील महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ राहाता तालुक्यातील राजुरी येथे आयोजित केली होती.
बैठकीत शालिनी विखे म्हणाल्या, विखे कुटुंबीयांनी कोणाचे वाईट केले का? एका तरी मतदाराने उभे राहून तसे सांगावे. मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून उच्चांकी मतदान घडवून आणावे. कार्यकर्त्यांनी अंतर्गत गटबाजी थांबवावी.
गावात कोण काय करतो हे आम्हाला माहीत आहे, परंतु त्याकडे लक्ष न देता विकासाला प्राधान्य देऊन रस्ते, अंगणवाडी, घरकुल, रेशनकार्ड, गरिबांना लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समोरचा उमेदवार कोण आणि कसा याचा विचार करू नका. पाठीमागून खंजीर खुपसण्यापेक्षा समोर येऊन लढा, असे विखे म्हणाल्या.