नगर – हुंडयाच्या पैशासाठी घटस्थापनेच्या दिवशीच विवाहित तरूणीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. औषधोपचार घेत असतांना तिचे निधन झाले. या प्रकरणी नवऱ्यासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लग्नामध्ये हुंड्याचे राहिलले पंधरा हजार रूपये दिले नाही म्हणून शुभांगी संदिप नाकाडे, वय २१, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव या विवाहित तरूणीला घटस्थापनेच्या दिवशी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. पुणे येथील ससून रुग्णालयात तिला औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच शुभांगी हिचा मृत्यू झाला.
मयत शुभांगी हिने पोलीसांपुढे मृत्यूपूर्व जबाब दिला होता. तोफखाना पोलीस ठाण्यात मयत शुभांगी हिचा नवरा संदिप बाबासाहेब नाकाडे, सासरा बाबासाहेब नाकाडे, व सासू अनिता बाबासाहेब नाकाडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.