पिचडांची सभा उधळणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध

Published on -

धामणगाव पाट येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रचार सभेत काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध धामणगाव पाट येथील पिचड समर्थकांनी केला आहे. या पुढे असे वागाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना व्यक्त केली. दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सभा काही विघ्नसंतोषी लोकांनी उधळली होती.

त्याचा निषेध धामनगाव पाटच्या ग्रामस्थांनी करताना या घटनेबाबत संताप व्यक्त केला. विरोधकांचे अतिशय गलिच्छ राजकारण आता पहावयास मिळत आहे, माजीमंत्री पिचड यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या वटवृक्षावर वाढलेली दोन चार बांडगुळं सभेमध्ये सोडुन कल्लोळ करायला लावत आहे, गडबड गोंधळ घालायची संस्कृती तुमची आहे, असा आरोप करीत ही संस्कृती पिचड कुटुंबाची, बीजेपीची नाही आणि त्याचबरोबर पिचड यांच्या कार्यकर्त्यांचीही नाही हे लक्षात घ्यावे, असा सज्जड दम पिचड समर्थकांनी विरोधकांना भरला आहे.

दारु पाजून एक दोन बांडगुळं सभेत सोडायची आणि लोकांना दाखवायचं की बघा पिचड यांना लोकं कसे करताय… जर तुम्ही ही दंडेलशाही करणार असाल व लोकशाही पद्धतीने प्रचार होऊ देणार नसाल तर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही पण तयार आहोत हे लक्षात ठेवावं.

तुमच्याच नेत्याप्रमाणे आम्हालाही म्हणावं लागेल की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे विसरु नका, लहामटे ज्या गावोगावी सभा घेतील त्या वेळेस आम्ही पण त्यांना प्रश्न विचारणार की, बाबा ज्या वेळेस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होत नव्हता तेंव्हा तु कुठे होतास? प्रवरा नदीवरील कीटीवेअर फोडण्याच्या ऑर्डर दिल्या तेंव्हा तुम्ही कुठे होता? आमची वीजप्रवाह खंडण करण्याच्या ऑर्डर दिल्या तेंव्हा हे लहामटे कुठे होते?

अहमदनगर जिल्ह्यात माजीमंत्री पिचड आणि सीताराम पा. गायकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यानी एक नंबर भाव दिला तेंव्हा तुम्ही कुठं होता? या आमच्या सर्व सुखदुःखात पिचड कुटूंब, गायकर हीच लोकं होती, तेंव्हा कार्यकर्त्यांना आवरा, असा इशारा यावेळी पिचड समर्थकांनी दिला.

नुसते लोकांचे दहावे, लग्न आणि तेरावे करून आमदार होता येत नसतं, त्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. लोकांच्या गरजा जाणुन घ्याव्या लागतात. आज तुमच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने घेण्यात येत असलेल्या सभेत जो कल्लोळ करुन उच्छाद मांडला त्याचं उत्तर त्यांना जागेवरही मिळालं असतं. होते तरी कीती हो ते दोन ते तीन जण परंतु ती आमची संस्कृती नाही, असे सांगत शेवटी पुन्हा एकदा ह्या बांडगुळरुपी अपप्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!