नेवासा – नेवासा मतदार संघात दररोज चित्र बदलत असल्याने जिल्ह्याचे इकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रारंभी येथे वरवर माजी आ. गडाखांचे पारडे जड वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा देवून मतविभाजन टाळले खरे, मात्र यातून गडाखांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.
असे असतानाही घुलेंच्या निवासस्थानी जावून गडाखांनी त्यांची घेतलेल्या भेटीमुळे आ. मुरकुटेंची झोप उडाली. मात्र, काही तासातचं जि. प. माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे भाजपात दाखल झाल्याने पुन्हा मुरकुटेंच्या चेहऱ्या हास्य फलले तर गडाख कोमजल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरम्यान, येणाऱ्या काळात मुरकुटेंचा यॉर्कर गडाख आपल्या बॅटने कसा खेळून काढणार? याकडे जनतेचे लक्ष असणार आहे. नेवासा मतदार संघात गडाख – मुरकुटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे माजी आ. शंकरराव गडाख यांनी विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटेंना पाडण्यासाठी जोरदार व्यूहरचना केलेली आहे. तशी पाच वर्षापासून ती तयारी सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीत असुनही मागील वेळी आपल्याला न पडलेली मते मुरकुटेंना न जाता ती स्वतंत्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाली, तर फायदा होऊ शकतो, या हेतूने गडाखांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष लढण्याचा निर्धार केला.
सुरूवातीला झालं ही तसं, मात्र अचानक राष्ट्रवादीने येथे गडाखांना पाठींबा दिल्याने पुन्हा एकदा ‘ती’ मते आपल्याला मिळणार असल्याची खात्री नसलेले गडाख अस्वस्थ झाले. त्यातून सावरत त्यांनी झालं गेलं विसरून घुलेंच्या निवासस्थानी भेट घेत मैत्रीचे संबध प्रस्थापित केले. हे बदलते समीकरण पाहून
आ. मुरकुटेंही अस्वस्थ झाले. खरतर , गडाख – घुले एक होऊ नये, यासाठी मुरकुटे हे पाच वर्षापासून देव पाण्यात बुडून आहेत, हे सर्वांना ज्ञात आहेच. मात्र, त्यानंतरही हे आता एकत्र आल्याने मुकुरकुटेंना डोळ्यांसमोर पराभव दिसू लागला.
दरम्यान, पुन्हा पडद्याआड काही घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीकडून नेवाशात इच्छूक असलेले आणि ज्यांच्यासाठी घुले बंधुनही प्रयत्नशील असलेले मा.जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे अचानकपणे भाजपात दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा नेवासाचे चित्र बदलून मुरकुटेंना काहीसं हायसं वाटल तर गडाख पुन्हा काहीसे अस्वस्थ झाल्याचे वास्तव आहे.
यात प्रश्न उरतो तो की, नेवासात मतविभाजन होणार नाही, मात्र, अपक्ष गडाख यांच्यामागे राष्ट्रवादी उभी राहणार का? याचे उत्तर लंघेच्या भाजप प्रवेशातून काही अंशी मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुरकुटेंचा यॉर्कर गडाख आपल्या बॅटने कसा खेळून काढणार? याकडे जनतेचे लक्ष असणार आहे.