श्रीगोंदे
घोड व कुकडीचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, ऊस, लिंबूसह अन्य पिकांची स्थिती चांगली असून या पुढेही पाणी नियमानुसार घेऊ, असे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी शनिवारी पारगाव येथे सांगितले.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचपुते म्हणाले, मी चाळीस वर्षे काय केले, या विरोधकांच्या प्रश्नात राजकारण आहे. जे प्रश्न करतात, त्यांच्यातच आपल्यामुळे बदल झाला आहे. मागचे आठवून पाहिले, तर कोरा चहा, घरात कंदिलाचा उजेड व पावसावर शेती हे समीकरण कधीच बदलले आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारच्या माध्यमातून मी भरघोस कामे केली. मात्र, भाजपचा आमदार नसल्याचा तोटा मतदारसंघाला भोगावा लागला. श्रीगोंद्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे.
पाचपुते म्हणाले, माझी पहिली निवडणूक ३९ वर्षांपूर्वी झाली. त्या वेळचा तालुका आणि आजचा मतदारसंघ यात मोठा फरक पडला आहे. त्या वेळी सुविधांची वानवा होती. वीज, रस्ते आणि पाणी या लोकांच्या अपेक्षा होत्या. एकच वीज उपकेंद्र होते. आज तीस झाली आहेत. दहाच्या दरम्यान मुख्य केंद्रे आहेत. विजेबाबत मतदारसंघ समृद्ध झाला, तरीही सौरऊर्जा प्रकल्प आणून चोवीस तास वीज देण्याचा प्रयत्न सुरू केला.
घोड, कुकडी व भीमाच्या पाण्याने तालुका बागायती केला. त्या वेळी पाणीच नव्हते आणि आता असले, तरी कमी पडत आहे. आता माणिकडोह ते डिंभे धरणादरम्यान बोगदा व कुकडी प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या चार हजार कोटींसाठी मीच पाठपुरावा केला. माळढोक आरक्षणाचा अनेक वर्षांचा प्रश्न निकाली काढल्याने औद्योगिक वसाहतीचा अडसर दूर झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.