नाशिक:चारित्र्याचा संशय व लग्नात मानपान दिला नाही या कारणावरून त्रस्त झालेल्या एका विवाहितेने शेततळ्यात आत्महत्या केल्याची घटना शिंदे पळसे भागात घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट पुंडलिक सोनवणे (३५, रा. इंदिरानगर, पाथर्डी गाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांची भाची दीपालीचा विवाह सन २०१८ मध्ये नाशिक – पुणे महामार्गावरील शिंदे पळसे येथे राहणारे सचिन सुरेश गायधनी याच्यासोबत झाला होता.
लग्नानंतर काही दिवस त्या दोघांचा संसार सुरळीत चालला असताना, तिचा पती कायम चारित्र्याचा संशय घेत असे तसेच लग्नात मानपान दिला नाही, या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत, मानसिक छळ करीत असे.
या छळाला कंटाळून, दि. १० ऑक्टोबर रोजी दीपालीने जवळच असलेल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.