जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर –

पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात सर्वात कमी ५२.६९ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. 

पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. पाथर्डी तालुक्यातील वडगाव ढाकणवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला.

कर्जत-जामखेड मतदारसंघ व पारनेर तालुक्यातील पुणेवाडी वगळता जिल्ह्यात अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांची काही काळ गैरसोय झाली. संथ प्रक्रियेमुळे अनेक ठिकाणी मतदारांना तास-दीड तास रांगेमध्ये तिष्ठत उभे रहावे लागले. 

नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे एका बूथवरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार एक तास खोळंबले होते. नंतर मशीन बदलून मतदानाला सुरुवात झाली. नगर शहरात दुपारी पावसाला सुरुवात झाली, तरी मतदारांचा उत्साह ओसरला नाही.

पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले, संग्राम जगताप, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, भाऊसाहेब कांबळे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

मतदान गोपनीयतेचा भंग होऊ नये, यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताना मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कॅमेरे व मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना तशा कडक सूचनाही दिलेल्या होत्या. 

परंतु नेवासे तालुक्यातील घोडेगाव आणि पाथर्डी तालुक्यात या सूचनेची पोलिसांनी अंमलबजावणी केली नाही. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक सिंधू यांना दिल्यानंतर मतदान केंद्रावरील बंदोबस्त कडक करण्यात आला.

नेवाशात सर्वाधिक ८०, तर नगर शहरात सर्वात कमी ५३ टक्के मतदान

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

अकोले : ६७.७३
संगमनेर : ६९.३०
शिर्डी : ७०
कोपरगाव : ६९.४०
श्रीरामपूर : ६२.१४
नेवासे : ८०
शेवगाव-पाथर्डी : ६४.५६
राहुरी : ६२.९१
पारनेर : ६३.८८
अहमदनगर : ५२.६९
श्रीगोंदे : ७२
कर्जत-जामखेड : ७१.२९
एकूण : ६७

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment