पुणे –
शिकवणीसाठी येणाऱ्या नववीच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या खासगी क्लासेसच्या चालकाला मुलीच्या पालकांनी बेदम चाेप दिल्याची घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सोमवारी घडली.
याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी संबंधित चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. जयप्रकाश पाटील (३४, मु. रा. लातूर) असे आरोपीचे नाव आहे.
शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश गिरमे यांनी याप्रकरणी पाेलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. सिंहगड रस्त्यावर अभिरुची माॅल समाेर जयप्रकाश पाटील यांची शिक्षा अकॅडमी आहे. क्लाससाठी येणाऱ्या अनेक मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
मात्र, यासंदर्भातील प्रकरण दडपण्यासाठी अनेकदा पाेलिसांना हाताशी धरून पालकांवरच दबाव टाकण्यात आला. पाेलिस कर्मचारी दत्ता साेनवणे व दया तेलंगी यांनी याकामी जयप्रकाश पाटील यांना मदत केल्याचे निदर्शनास अाल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता. आरोपी जयप्रकाश हा मुलींना केबिनमध्ये बाेलवून त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. याच क्लासमध्ये पीडित मुलगी शिकवणीसाठी येत होती. आठ दिवसांपूर्वी आरोपीने मुलीला तू मला आवडतेस’ असे सांगून प्रेमाची गळ घातली.
मात्र, मुलीने त्याला दाद दिली नाही. मुलीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला जाब विचारला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी त्याला बेदम चाेप दिला.