कर्जत : केंद्र व राज़्यातील भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असून, या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. . कर्जत येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात पवार बोलत होते.
सभेपूर्वी अजित पवार यांचे मिरजगावपासून रॅलीने स्वागत करण्यात आले. जामखेडचे दत्तात्रय वारे यांनी स्वागत केले. या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जामखेडचे, सूर्यकांत मोरे, पं. स. सभापती सुभाष आव्हाड,
उपसभापती राजश्री मोरे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार सायकर, अहिल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे, ना. शिंदे यांचे सचिव अशोक धेंडे, अमृत महाराज डुचे, यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शब्बीर भाई पठाण यांच्या वृद्ध भूमिहिन शेतमजूर संघटनेने या वेळी पाठिंबा जाहीर केला.
या वेळी राजेंद्र गुंड यांनी, प्रथमच रोहित पवार यांची उमेदवारी जाहीर करताना स्वत:ची उमेदवारी मागे घेतली व आमचं ठरलंय, रोहित पवारच आमदार, अशी घोषणा दिली. या वेळी रोहित पवार यांनी, कर्जत -जामखेड तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही,
येथील मंत्री कुकडी वाटप समितीच्या बैठकांना अनेकदा उपस्थित राहत नाहीत, हे फक्त आश्वासने देतात, सूतगिरणीच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचा आरोप करतानाच गटातटाचे राज़कारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले.