ठाणे : एकीकडे पाकिस्तानवर टीका करून महाराष्ट्राची निवडणूक लढवणाऱ्या भाजपा सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातूनच केली आहे.
या संदर्भातील पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिला आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे भाजपा सरकार तोंडघशी पडले आहे.


३७० कलम, बालाकोट असे मुद्दे भाजपाच्या प्रचारामध्ये दिसत असले, तरी भारताने चक्क पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे मृतप्राय झालेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला भारताकडूनच ऊर्जितावस्था मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘हा घ्या पुरावा कांदा पाकिस्तानमधून आणणार आणि महाराष्ट्राची निवडणूकपाकिस्तानला केंद्रबिंदू ठेवून लढवणार;मस्त आहे ना! येडे आहेत महाराष्ट्रातले असे वाटते,’ असे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे, या ट्विटसोबत एमएमडीसी लिमिटेडचे आयात निविदेचे चलनही त्यांनी जोडले आहे. ६ सप्टेंबर रोजी ही कांद्याची मागणी करण्यात आलेली असून हा २ हजार मेट्रिक टन कांदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतात दाखल होणार आहे,
असे या चलन पावतीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आ. आव्हाडांनी दिलेल्या या पुराव्यामुळे भाजपाचा पाकिस्तानविरोध हा तकलादू असल्याचे उघडकीस आले आहे.