आता भक्तांना विनापास विठुरायाचे दर्शन घेता येणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-  विठूमाऊलीच्या भक्तांसाठी एक महत्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे. विठ्ठल- रुक्‍मिणी भक्तांना दर्शनासाठी कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन पासची सक्ती रद्द करण्यात आली असून, पासविनाही आता विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी या दिवशी मंदिर समितीची बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ‘ऑनलाईन’ पासद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिदिन ५ सहस्र भाविकांना मुखदर्शन घेता येत होते.

१२ जानेवारीपासून प्रतिदिन ८ सहस्र भाविकांना मुखदर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, ऑनलाइन बुकिंग करूनही भाविक दर्शनासाठी येत नसल्याने मंदिर रिकामे राहात असल्याची बाब समितीच्या लक्षात आल्यानंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पास काढण्याची गरज नाही, असा निर्णय घेण्यात आला. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे ऐववेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे.

दरम्यान, ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि १० वर्षांखालील लहान मुलांना मंदिरातील प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही आता वाढू लागली आहे. परंतु पास नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती.

भाविकांच्या मागणीनुसार मंदिर समितीने पासविना दर्शन देण्याचा निर्णय घेतल्याने पंढरीत येणाऱ्या भाविकांना आता कोरोनाचे सर्व नियम पाळून विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment