अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे.
यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. नुकतीच पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद केले आहे.
मात्र आता जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्याच्या पठारभागात घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला चढवत ठार केल्या आहेत.
यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, शिंदोडी गावांतर्गत असलेल्या इनाम वस्ती येथील शेतकरी पोपट कुदनर यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरासमोर शेळ्या बांधल्या होत्या.
दरम्यान, दोन बिबट्यांनी येथे येत थेट शेळ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात शेळ्या जागीच ठार झाल्या तर त्यातील एक शेळीस बिबट्या घेऊन गेला. कुदनर कुटुंबीयांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साकूर, बिरेवाडी परिसरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची वाढती दहशत पाहता शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved