अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- ऊस तोडणी कामगारांना सन 2020 व 21 पासून दरवाढ मिळावी व विविध मागण्यांसाठी ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन बुधवार दि.7 ऑक्टोबर रोजी संप केला.
नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौक येथे सर्व ऊस तोडणीसाठी निघालेल्या गाड्या थांबवून काम बंद करण्यात आले. तर नवीन दरवाढीचा करार तसेच विविध मागण्या मान्य होईपर्यंत एकही ऊसतोड कामगार मजूर कारखान्यावर ऊस तोडण्यासाठी जाणार नसल्याची भूमिका सर्व संघटनेच्या वतीने घेण्यात आली होती.
ऊस तोडणी वाहतुकीच्या दरात 150 टक्के वाढ करण्यात यावी, ऊस तोडणी मुकादमाच्या कमिशनमध्ये 18.5 टक्के ऐवजी 37 टक्के करण्यात यावी, प्रत्येक कारखान्याला 100 टक्के शौचालय असल्याशिवाय त्या कारखान्यास गाळप परवाना देण्यात येऊ नये,ऊसतोड मजुरांचा व बैलांचा विमा संपूर्ण कारखान्याने भरावा,
कारखान्यावर ऊस तोडणी मजूर नेणे व आणण्याचा संपूर्ण खर्च कारखान्याने द्यावा, ऊस तोडणी मजूर कारखाना साईटवर गेल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वॉरनटाईन करण्यात येऊ नये, तसे केल्यास त्या दिवसाचे होणारे नुकसान भरपाई कारखान्याने द्यावी, ऊस तोडणी वाहतूकदाराचा होणारा करार हा तीन वर्षाचा करण्यात यावा,
हंगाम 2014-15 या हंगामा मधील 20 टक्के फरकाची रक्कम देण्यात यावी, मुकादमाच्या मजुराला दिलेल्या उचलीला कायद्याचे संरक्षण द्यावे, ऊसतोड मजुरांसाठी कामगार कायदा लागू करावा, राज्य सरकारने कोरोना उपचारासाठी प्रत्येक कारखान्यासाठी स्वतंत्र दवाखाना उभारावा,
ऊस तोडणी मजूर व बैल यांना मोफत आरोग्य व उपचार सेवा देण्यात यावी, शासनाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ऊसतोड मजुरांची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागण्या पुर्ण होईपर्यंत संप सुरु राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved