Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना दिलेले १० टक्के आरक्षण ज्यांना पाहिजे ते घेतील, परंतु आमची मागणी ओबीसीतून आरक्षण देण्यासह सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीची आहे.
त्यामुळे जोपर्यंत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेpशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत टप्या-टप्याने आंदोलने हाती घेतली जाणार आहेत.
त्याची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होत आहे. पहिल्याच टप्यात सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत गावागागावात आंदोलन, प्रचारासाठी गावात येणाऱ्या पुढाऱ्यांच्या वाहनांना गावबंदी करू, तरीही वाहने आली तर ती ताब्यात घेऊन निवडणुकीनंतर परत केली जातील,
असा इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला दिला आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.
राज्य सरकारच्या मंगळवारच्या विशेष अधिवेशनानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी जरांगे- पाटील यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे समाजबांधवांच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, मंगळवारी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायला हवा होता,
परंतु १० टक्के आरक्षण देऊन बोळवण करण्याचा सरकारचा डाव आहे. आम्हाला हे आरक्षण मान्य नसून या आरक्षणाची आमची मागणीच नव्हती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, आम्ही दिलेल्या व्याख्येसह सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी,
परंतु या मागणीचा कोठेही उल्लेख केला गेला नाही, असे नमूद करून ते म्हणाले की, आपल्याला शांततेचा लढा उभारावा लागणार आहे.
आपल्या न्यायासाठी आता टप्या-टप्याने आंदोलने हाती घेणार आहोत. पहिल्या टप्यात येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात आंदोलन करायचे आहे.
तसेच १ मार्च रोजी वृद्ध व्यक्तींनी अंतरवालीत आमरण उपोषणास बसावे, उपोषणादरम्यान त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला संपूर्णपणे सरकार जबाबदार राहील, असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला. त्यानंतर ३ मार्च रोजी राज्यात एकाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
भुजबळांवर निशाणा..!
विधानसभेत बोलताना मंत्री छगन भुजबळांनी आपल्याविषयी विधान केले. जीवाला धोका असल्याचे म्हटले, धमक्या मिळत असल्याचे सांगितले, आम्ही कशाला त्यांना टपकावू (मारू), एकदा – आम्हाला आरक्षण मिळू द्या, मग आम्ही त्यांना सांगतो, अशा शब्दात जरांगे-पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला.
सरकारी डॉक्टरांकडून उपचार घेणार
आपले आमरण उपोषण सुरू राहील, परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी डॉक्टरांकडून उपचार घेणार आणि समाजाखातर पाणीही घेणार, असे जरांगे-पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्व मराठा लोकप्रतिनिधींनी यावे!
१ मार्च रोजी गावातील वयोवृद्ध उपोषणाला बसणार असून त्यांना भेटण्यासाठी मराठा समाजातील सर्व मंत्री, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधीनी अंतरवाली सराटीत यावे, असे ते यावेळी म्हणाले.