नग्न महिलेचा मृतदेह मुंडक कापलेल्या अवस्थेत आढळला

Ahmednagarlive24
Published:

अमरावती : चमन नगरजवळ चांदुरी मार्गावरील एका शेतातील विहिरीतून मुंडक कापलेल्या अवस्थेत एका महिलेचा नग्न मृतदेह बुधवारी बाहेर काढण्यात आला.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह विहिरीत फेकल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. दरम्यान, हत्या करण्यापूर्वी सदर महिलेवर अतिप्रसंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जनावरे चारणाऱ्या गुराख्याला बडनेरा शहरापासून दोन किमी अंतरावरील चांदुरी मार्गालगतच्या संजय नरेंद्र टावरी यांच्या विहिरीत हा मृतदेह मंगळवारीच दिसून आला. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले; परंतु विहिरीभोवती प्रचंड झाडेझुडपे असल्याने अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली.

अग्निशमन पथकाने मोठया प्रयत्नांनी अडथळे दूर केले; मात्र मंगळवारी अंधार झाल्याने मृतदेह विहिरीतून काढण्यात अपयश आले. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा अग्निशमन विभागाने मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मृतदेह बाहेर काढला असता, त्या महिलेचे केवळ धडच असल्याचे दिसून आले.

शिवाय त्या मृतदेहाच्या अंगावर एकही कापड नसल्याने प्रचंड खळबळ उडाली. महिलेच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर चाकुचे अनेक वार आढळून आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत अतिप्रसंग करून महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी लगतच्या परिसराची पाहणी करून महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्नदेखील केले; परंतु वृत्त लिहिस्तोवर महिलेची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील शव विच्छेदनगृहात ठेवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment