महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महसूल खात्यातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तवणूक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव तालुक्यातील महसूल खात्यातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तवणूक करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली. शिवसेना तालुका महिला आघाडी प्रमुख जया जाधव, काँग्रेसचे सुधीर बाबर, प्रकाश तिजोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करतात. लिपिक, तलाठी महिलांना केबिनमध्ये बोलावून कुठलेही काम न सांगता ताटकळत उभे करतात. दैनंदिन कामाव्यतिरिक्त खासगी व कौटुंबिक आयुष्याविषयी प्रश्न विचारून अश्लील चर्चा व शेरेबाजी करतात. शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला जातो. इतरांच्या मोबाइलवरून फोन करून एकट्या महिलेला सरकारी कागदपत्रे घेऊन बोलवले जाते.

वेतनवाढ रोखणे, शिस्तभंग, खातेनिहाय चौकशीचा दबाव टाकून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो. वाच्यता केल्यास आपल्यावर कारवाईबरोबरच बदनामी होईल, या भीतीपोटी कुणीही तक्रार करण्याचे धाडस केले नाही. मात्र, काही महिलांनी एकत्र येत आपले अनुभव एकमेकींना सांगितल्यावर याबाबत निवेदन देत दाद मागण्यात आली.

समाजमाध्यमात हे वृत्त प्रसारित झाल्यामुळे खळबळ उडाली. महिला कर्मचाऱ्यांनी महसूलमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर गोपनीय संदर्भ असे म्हटले असून त्यावर १० महिला कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनाही निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment