अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यापर्यंत जाणे आणि कोणत्याही गोष्टीत ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझे वाक्य लिहून घ्या, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. पिंपरी‘चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर मुंडे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी धनंजय मुंडे यांनी जातिवाचक नावे हटवण्याच्या निर्णयाबाबतही भाष्य केले. जी जातिवाचक नावे सरकारी रेकॉर्डवर आहेत ती अाधी काढली पाहिजेत, असा प्रस्ताव आपण समोर आणला.

तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यानंतर जो नियम केला जाईल त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या जातील, असेही ते म्हणाले. कृषी कायद्यांवर ते म्हणाले की, राज्याचा हमीभाव कृषिमूल्य आयोग तयार करून त्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडे पाठवते. हमीभाव ठरवण्याची जबाबदारी केंद्राकडे आहे.
ज्या वेळी ‘कन्व्हेन्स’ करता येत नाही तेव्हा भाजपकडून ‘कन्फ्युज’ करण्याचे प्रयत्न केले जाते. दरम्यान शरद पवार यांचे आयुष्य महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या विकासासाठी गेले आहे. ज्या जबाबदारीमध्ये आम्ही आहोत, आमच्या विभागामार्फत जनतेच्या उपयोगी योजना त्यांच्यासमोर आणणे, सामान्य व्यक्तींचा फायदा होणे ही मोठी भेट पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असू शकते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com













