महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. मराठा बांधव आता आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. दरम्यान याचा फटका मोदींच्या शिर्डी येथील सभेला बसला.
मोदींच्या सभेच्या एक दिवस आधीच मराठा संघटनांनी मोदींनी मराठा आरक्षणाबाबत बोलावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचे परिणाम आज सभेपूर्वी पाहायला मिळाले.
अनेक ठिकाणी मोदींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसेस फोडल्याची घटना घडली आहे. या सभेसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बसच्या काचा देखील फोडल्याची घटना घडली आहे.
त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या सभेला विरोध म्हणून अनेक गावांमधून मोकळ्या बसेस पाठवण्यात आल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी यात बसण्यास विरोध केला.
पुढाऱ्यांना गावबंदी
महाराष्ट्रातील अनेक गावांत पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे आता अनेक नेत्यांची पंचाईत देखील झाली आहे. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील कार्यक्रमाला देखील तरुणांनी विरोध केल्याचे प्रकरण नुकतेच घडले. त्यामुळे आता मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आलेला दिसतो.
मोदी गो बॅकच्या घोषणा…
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला मराठा बांधवांनी जोरदार विरोध केलेला पाहायला मिळाला. नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव साखळी उपोषण सुरु आहे. येथे आंदोलकांनी काळ्याफिती लावून तीव्र शब्दात निषेध करत गो बॅक..गो बॅक..मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या.