अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेथे शिवसेना आणि भाजप बरोबर पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केल्या असतील तेथे पाठिंबा काढून घ्या असे आदेश दिले आहेत.
मनपात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला असला, तरी सत्तेत सहभाग घेतलेला नाही, पण राष्ट्रवादीने दिलेला आदेश बडतर्फ १८ नगरसेवक पाळून भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा करणार का ? यावर चर्चा सुरू झाली आहे.

जर १८ नगरसेवकांनी या आदेशाची अंमलबजावणी केली, तर भाजप अल्पमतात दिसून येईल.राष्ट्रवादी काँग्रेसने जेथे भाजप व शिवसेनेला पाठिंबा दिला असेल, त्या ठिकाणी पाठिंबा काढून घेण्याचे आदेश दिले आहेत, याला पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही दुजोरा दिला आहे.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या १८ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजप मनपात सत्तेवर आहे, पण या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर दखल घेत १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केले होते.