ते नेते उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता

Ahmednagarlive24
Published:

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तयारीसाठी दोन दिवसांपूर्वी नगरला झालेल्या जिल्हा भाजप कोअर कमिटी बैठकीस अकोल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश दिलेल्या अकोल्याच्या आमदार वैभव पिचडांचे कट्टर विरोधक म्हणून भांगरे ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर आता भांगरेंचे करायचे काय, असा प्रश्न जिल्हा भाजपच्या धुरिणांसमोर आहे.

अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड व त्यांचे वडील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांचा जंगी पक्ष प्रवेश सोहळाही झाला.

पिचड पिता-पुत्रांना भाजपने प्रवेश दिल्याने अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे नाराज झाले आहेत. मधुकर पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्याविरोधात भांगरेंनी आंदोलनही केले आहे व पिचडांवर जोरदार टीकाही केली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दौरा नियोजनासाठी झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठकीस त्यांची उपस्थिती आश्चर्यकारक मानली गेली. त्यांना पाहिल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यावरून आपसात चर्चाही झडली.

पण भांगरे जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीत आहेत, पिचडांवर टीका केली म्हणून त्यांच्यावर पक्षाने अजून काही कारवाई केलेली नाही वा पक्षातून काढूनही टाकलेले नाही. अशा स्थितीत कोअर कमिटी सदस्य म्हणून त्यांना निमंत्रण देणे पक्ष नियमानुसार बंधनकारक असल्याने त्यांची येथे उपस्थिती असावी,

असेही मत या वेळी काहींनी मांडले. अर्थात या बैठकीत दौरा नियोजनाव्यतिरिक्त अन्य राजकीय चर्चा फारशी झाली नाही. तरीही आता भांगरेंचे काय, असा प्रश्न बैठकीनंतर भाजप समर्थकांमध्ये चर्चेत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment