नगर जिल्हा हा मोठ्या नेत्यांचा जिल्हा आहे. लोकसभेच्या निवडणुकीअगोदर सुरू झालेली पक्षांतरं अजूनही सुरू आहेत. भारतीय जनता पक्षात जाऊन राज्यात गृहनिर्माणमंत्री झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जिल्ह्यात युतीला 12 आणि दोन्ही काँग्रेसला शून्य अशा जागा मिळणार असल्याचं जाहीर केलं असलं, तरी तसं होणं अशक्य आहे. त्याची कारणं या जिल्ह्यात पाय ओढीचं राजकारण, पक्षांतर्गत निर्माण झालेली स्पर्धा आणि संभाव्य बंडखो-या याच आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 12 पैकी 11 विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य होतं आणि त्यानंतर ज्या अकोले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य होतं, त्या अकोल्यातील मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं बाराच्या बारा विधानसभा मतदारसंघात युतीला यश मिळायला हवं, असं विखे यांच्या विधानामागचं गणित आहे.
लोकसभेची आणि विधानसभेची गणितं वेगवेगळी असतात. तिथं स्थानिक प्रश्न तसंच उमेदवारही महत्त्वाचे असतात. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानं त्यांचा संगमनेर मतदारसंघ हा काँग्रेससाठी महत्त्वाचा आहेच. 1985 पासून सातत्यानं थोरात तिथून निवडून येत आहेत. विखे यांनी तिथं संपर्क कार्यालय सुरू केलं असलं आणि संगमनेरमध्ये दाैरे वाढविले असले, तरी युतीला हा मतदारसंघ जिंकणं तितकंसं सोपं नाही.
जामखेड-कर्जत मतदारसंघ हा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा मतदारसंघ. राज्यात भाजपसाठी कितीही अनुकूल वातावरण असलं, तरी कर्जत-जामखेडमध्ये नाही म्हटलं, तरी रोहित पवार यांनी प्रा. शिंदे यांच्यापुढं कडवं आव्हान उभं केलं आहे.
गेल्या वेळी भाजपला पाच, शिवसेनेला एक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या दोन आमदारांनी, राष्ट्रवादीच्या एका आमदारानं युतीत प्रवेश केल्यानं युतीचं पारडं जड असलं, तरी अकोल्यात एकास एक लढतीसाठी चाललेले प्रयत्न, भाजपच्याच डाॅ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, नेवासे, पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उभं केलेलं बंड, नगर शहर मतदारसंघावर भाजपनं केलेला दावा या सर्व बाबी पाहिल्या, तर युतीतही सारं आलबेल आहे, असं नाही.
श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी त्यांनाही निवडणूक जिंकणं तितकंसं सोपं नाही. त्याचं कारण माजी नगराध्यक्ष जयंत ससाणे यांचा गट तसंच खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी ही कांबळे यांच्याविषयी व्यक्त केलेली नाराजी आणि शिवसेनेचे मागच्या वेळचे उमेदवार लहू कानडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला प्रवेश पाहता राजकीय समीकरणं किती वेगानं बदलतात, हे लक्षात येतं.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. अर्थात तेथील बंडखोरी भाजपच्या सध्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याच पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुकीतील यशानं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात विजयाची जास्त खात्री असल्याचं समजून तिकडं उड्या मारणार्यांची संख्या जास्त आहे, तर दोन्ही काँग्रेसला बुडती जहाजं समजून तिथं राहणं पराभवाला निमंत्रण देण्यासारखंच आहे, असं वाटणार्यांची संख्या जास्त आहे.
आता विखे यांनी पिचड यांची साथ करायचं ठरविलं असलं, तरी विखे यांचे समर्थक असलेल्या भांगरे यांनी पिचड यांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे. तिथं पिचड विरुद्ध सर्व असं समीकरण तयार झालं आहे. सर्व पिचड विरोधकांनी शरद पवार यांची घेतलेली भेट हा त्याच व्यूहनीतीचा एक भाग आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विखे यांनी मोनिका राजळे यांची बाजू घेतली आहे. तिथं विखे यांच्या आतापर्यंतच्या समर्थक हर्षदा काकडे यांनी राजळे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.
नेवाशात आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्याविरोधात सचिन देसर्डा यांनी बंड पुकारलं आहे. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसकडून विठ्ठलराव लंघे मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. तिथं माजी आमदार शंकरराव गडाख यांनी त्यांच्या शेतकरी क्रांती या पक्षातून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नगर-राहुरी मतदारसंघात शिवसेनेच्या अनिल कराळे यांनी कर्डिले शिवाजीराव यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.
जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले जरी शिवसेनेचे असले, तरी त्यांची गणना विखेसैनिक म्हणून होत असते. त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे. त्यांचं बंड झालं, तर ते औटींनाच मारक ठरणार, यात कोणतीही शंका नाही.
- कृष्णा गोदावरी खोऱ्याकरिता स्थापन करण्यात येणार निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा
- कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट
- लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत