कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित

Ahmednagarlive24
Published:

जामखेड : साहेब रोहितदादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ असे साकडे जामखेडमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना घातले.

यावर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. यावेळी गाडीत मागे बसलेल्या रोहितकडे कटाक्ष टाकत ‘तुझी मागणी झाली’ असे पवार म्हणताच कार्यकर्त्यांना कामाला लागा असाच संदेश गेला.

पवारांची भेट अन् कार्यकर्त्यांच्या मागणीवर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चेची ठरली.

खा.शरद पवार हे सोमवारी बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या जामखेड येथील निवासस्थानी काही काळ थांबले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी जामखेडच्या दुष्काळी परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. प्रा.मधुकर राळेभात, सुरेश भोसले, अमजद पठाण यांनीही दुष्काळाच्या समस्यांवर लक्ष वेधले.

यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन पवारांना देऊन जामखेडच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली. जामखेड शहराला २० ते २२ दिवसांनी पिण्यासाठी नळावाटे पाणी पुरवठा होतो. मात्र, तेही पाणी अस्वच्छ असते, अशा तक्रारी केल्या.

त्यावर तुम्ही पुरावे द्या, पुढचे मी पाहतो, दुष्काळी दौरा संपताच जामखेडचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, असे सांगत पवारांनी जामखेडचा पाणी प्रश्न सोडविण्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment