ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत आहेत, ती पुराव्यासह सांगितली, तर एवढं नाकाला का झोंबलं असा प्रश्न युवा नेते प्रशांत गडाख यांनी केला.

घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत गडाख म्हणाले, निवडणूक प्रश्नावर लढवली गेली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी आपण काय केले व पुढे काय करणार यावर बोलले पाहिजे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व द्या असे संस्कार आमच्यावर झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीपासून मुरकुटे यांनी गडाख कुटुंबीयांविषयी कुठल्या भाषेत काय काय बोलले आहे हे सर्व तालुक्याला माहीत आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आमच्या कुटुंबाने संयम पाळला. परंतु आमदारांकडून खालच्या पातळीवर टीका चालूच राहिली.

निवडून येण्यापूर्वी टीका आम्ही सहन केली, परंतु निवडून आल्यावर पाटपाणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, बेरोजगारी, घरकुले, व्यावसायिकांचे प्रश्न, पांढरीपूल येथील रखडलेली एमआयडीसी अशा अनेक समस्या त्यांना सोडवता आल्या नाहीत. निष्क्रियता लपवण्यासाठी त्यांनी फक्त आमच्या नावाचा जप चालवला. आम्ही बोलत नाही याचा गैरफायदा घेतला, म्हणून त्यांच्या आयुष्यात पूर्वी काय घडले आहे याची पुराव्यासह फक्त एक चुणूक दाखवली. आम्हालाही बोलता येते हे त्यांना कळावे यासाठी मला थोडे बोलावे लागले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment